दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दुसरबीड–राहेरी शिवारात खडकपूर्णा नदीत लाईनचे काम करत असताना बुडालेल्या तरुणाचा पाचव्या दिवशी अखेर मृतदेह सापडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.गौतम अंबादास गवई (वय २२, रा. ताडशिवणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. १९ डिसेंबर रोजी गौतम खडकपूर्णा नदीपात्रात लाईनचे काम करत होता. यावेळी पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी गोरखनाथ पवार यांनी तहसीलदार अजित दिवटे यांना कळवले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एनडीआरएफ पथक, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या वतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. पोलीस निरीक्षक ताराचंद पवार यांच्या नेतृत्वात सलग दोन दिवस नदीपात्रात शोध घेण्यात आला. तसेच पैठण येथील अनुभवी पाणबुड्यांनाही पाचारण करण्यात आले होते.
दरम्यान, आज घटनेच्या पाचव्या दिवशी सायंकाळी सुमारे चार वाजताच्या सुमारास गौतमचा मृतदेह खडकपूर्णा नदीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
या घटनेवेळी ताडशिवणी, राहेरी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोधकार्यादरम्यान किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर व त्यांचे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.या दुर्दैवी घटनेमुळे ताडशिवणी, राहेरी आणि परिसरात शोककळा पसरली असून गौतमच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.












