मोताळा :- (बुलडाणा कव्हरेज न्युज)
बुलढाणा-मोताळा मार्गावरील राजूर घाटात शुक्रवारी सायंकाळी मोठा अपघात झाला. दुचाकी आणि ऑटोरिक्षाची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षामधील पाच प्रवासी जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्याहून प्रवासी घेऊन मोताळ्याकडे जाणारी ऑटोरिक्षा (MH 28 C 1192) राजूर घाटातील बालाजी मंदिराजवळ आली असता समोरून येणाऱ्या दुचाकीला (MH 27 AG 7131) जोरदार धडक बसली.
धडकेचा जोर इतका जबर होता की दुचाकीस्वार वैभव सुरेश वाट (रा. बडनेरा, जि. अमरावती) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात रिक्षामधील पाच प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. अपघातानंतर काही काळ राजूर घाट परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.











