देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक; अंतिम टप्प्यात चुरस टोकाला! २९ हजार मतदार ठरवणार ८० उमेदवारांचे भवितव्य…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) देऊळगाव राजा नगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. २० डिसेंबर रोजी मतदानाचा अंतिम टप्पा पार पडणार असून, या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तब्बल ८० उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी २९ हजारांहून अधिक मतदार सज्ज झाले आहेत.

या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ३, तर नगरसेवक पदासाठी ७७ उमेदवार रिंगणात असून, ही लढत अत्यंत अटीतटीची झाली आहे. १० प्रभागांमध्ये ३० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

⚖️ न्यायालयीन आदेशामुळे पुढे ढकललेली निवडणूक आता प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. उशिरा सुरू झालेल्या प्रचारामुळे सुरुवातीला वातावरण शांत होते, मात्र आता शेवटच्या टप्प्यात सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे.

मतदारांची आकडेवारी…

एकूण मतदार : २९,३२६

पुरुष मतदार : १४,८५४

महिला मतदार : १४,४७२

ऐनवेळी झालेले पक्षप्रवेश, उमेदवार बदल आणि राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. देऊळगाव राजा नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

धनशक्ती व प्रशासनाची भूमिका….

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली असली तरी, ही कारवाई केवळ औपचारिक ठरत असल्याचा आरोप जाणकारांकडून होत आहे. पैशांचा प्रभाव रोखण्यात प्रशासन कितपत यशस्वी ठरते, यावर निकाल अवलंबून असेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

प्रतिष्ठेची थेट लढाई…

या निवडणुकीत विद्यमान आमदार मनोज कायंदे, माजी आमदार राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार शशिकांत खेडेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, ही निवडणूक स्थानिक मर्यादेत न राहता राजकीय वर्चस्वाची लढाई ठरत आहे.

२० डिसेंबरनंतर देऊळगाव राजा शहराच्या राजकारणाची दिशा ठरणार असून, मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!