मेहुणाराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) देऊळगावराजा तालुक्यातील मेहुणाराजा शिवारात शेतामध्ये अवैधरीत्या गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत सुमारे ३ लाख ८५ हजार रुपयांचा गांजा जप्त केला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या “मिशन परिवर्तन” या संकल्पनेअंतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.
१५ डिसेंबर रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, विष्णु सुखदेव बोरुडे (वय ३९, रा. मेहुणाराजा) याने आपल्या शेतात गांजाची लागवड केली आहे. या माहितीनुसार पोलिसांनी पंचासमक्ष शेतात धाड टाकली. तपासणीदरम्यान तुरीच्या उभ्या पिकामध्ये गांजाची झाडे लागवड करून साठवलेली आढळून आली.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ओलसर गांजाची झाडे जप्त केली. आरोपीविरुद्ध देऊळगावराजा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम २० (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.













