देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यात जुन्या शेतीच्या वादातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. देऊळगाव मही येथील शेतात राहणाऱ्या इंगळे कुटुंबावर १० डिसेंबर रोजी दुपारी सुमारे १ वाजता हा प्रकार घडला.अंबादास एकनाथ इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जण दारूच्या नशेत शेतातील घरावर आले. त्यांनी कुऱ्हाड, काठ्या, चाकू आणि कुदळीने हल्ला करत महिलांना मारहाण केली. त्या वेळी घरातील पुरुष बाहेर असल्याने महिलांनाच लक्ष्य करण्यात आले. आरोपींनी “नातवाला विहिरीत फेकू, महिलांच्या डोक्यात कुदळ मारू” अशा धमक्याही दिल्याचा आरोप आहे.घटनेनंतर तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेलो असता तेथे कर्मचारी नव्हते, असा दावा करण्यात आला आहे. तसेच चौकीतच मारहाण झाल्याचाही आरोप तक्रारीत नमूद आहे. जखमी महिलांना प्रथम देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर बुलडाणा येथे उपचारासाठी हलवण्यात आले.दरम्यान, आरोपींनी शेतातील बोअरची वायर तोडून नुकसान केले तसेच रस्त्यात अडवून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही सांगण्यात आले आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास २६ जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशाराही कुटुंबाने दिला आहे.
जुन्या शेती वादातून कुटुंबावर कुऱ्हाड-चाकूने हल्ला; कारवाई न झाल्यास २६ जानेवारीला आत्मदहनाचा इशारा…..













