चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) — मानवी जीवनासह पक्षी व प्राण्यांसाठी अत्यंत धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीविरोधात चिखली पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन चिखली अंतर्गत डी.बी. पथकाने ही कारवाई केली. १३ डिसेंबर रोजी ठाणेदार भूषण गावंडे यांनी शहरात अवैध नायलॉन मांजाविक्री रोखण्यासाठी विशेष आदेश दिले होते. त्यानुसार डी.बी. पथक शहरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदाराकडून नायलॉन मांजा विक्रीची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकून शेख जहुर शेख गफुर (वय ४९, रा. वार्ड क्र. १०, अंगुरचा मळा, चिखली) याला जागीच ताब्यात घेतले. त्याच्या कापडी पिशवीतून लाल रंगाचे ३ नायलॉन मांजाचे रिल सापडले. प्रत्येकी २५० रुपये किंमतीचे असे एकूण ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नायलॉन मांजावर शासनाची बंदी असतानाही विक्री करत असल्याने आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२५, २२३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५.१५ अंतर्गत पोलीस स्टेशन चिखली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नायलॉन मांजा खरेदी-विक्री करू नये आणि अशा प्रकारांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी.













