साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) गावात पुन्हा एकदा मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून गेल्या दोन दिवसांत १५ ते २० नागरिक व लहान मुलांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दि. १२ व १३ डिसेंबर रोजी कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमी झालेल्या नागरिकांना प्रथम स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देण्यात आले. त्यानंतर काही जखमींना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील रवींद्र मुदमाळी व प्रल्हादराय बंकटलाल अग्रवाल यांच्या दुकानात घुसून गोंधळ घातला होता. कुत्र्याच्या चाव्यात जखमी झालेल्यांमध्ये वॉर्ड क्रमांक १ मधील शे. अब्बास कुरेशी (४०), हस्नेन शाह अन्सार शाह (८), शे. आदील शे. इमरान (८), सुमैय्या परवीन शे. वाजीद (८) तसेच वॉर्ड क्रमांक ६ मधील सम्यक अनंगपाल झिने (३) यांचा समावेश आहे. शे. अब्बास कुरेशी यांच्या पोटरीचा लचकाच तोडल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, नजिकच्या मेहकर येथून बंद वाहनात कुत्रे आणून गावात सोडण्यात आल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. जर बाहेरून कुत्रे आणून येथे सोडले जात असतील तर ही बाब गंभीर असून ग्रामपंचायत प्रशासनाने याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे.
महत्त्वाचे म्हणजे गतवर्षीही पिसाळलेल्या कुत्र्यांनी गावात १५ ते २० नागरिकांना चावा घेतला होता. मात्र त्यावेळीही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.













