दुसरबीड(बुलडाणा कव्हरेज न्युज)सिंदखेडराजा रस्त्यावर नागझरी नाल्याजवळ आज सकाळी सुमारे ७ वाजता झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र तिचा लहान मुलगा आणि पती हे बचावले.
राहेरी बु. येथील भारतीय सैन्यात कार्यरत असलेले व सध्या सुट्टीवर घरी आलेले प्रमोद सुरेश गवई (३२) हे पत्नी सौ. कोमल गवई (२५) व लहान मुलासह बुलेट (MH 30 BK 4999) वरून सासर लोणार येथे जात होते.
त्यांच्या दुचाकीने पुढे चाललेल्या एका अज्ञात बैलगाडीला धडक दिली. त्यामुळे मोटारसायकल अचानक थांबली आणि मागे बसलेल्या कोमल गवई रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी समोरून जालन्याकडे जाणारा ट्रक (MH 21 BW 3344) त्यांच्या अंगावरून गेला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात पती प्रमोद गवई व लहान मुलगा सुखरूप बचावले. घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेडराजा येथे पाठविला. ट्रक चालक फरार असून वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू होती.













