जाफराबाद रोडवरील ‘कुप्रसिद्ध’ बायपास चौफुल्लीवर भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, तिघेजण गंभीर…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – जाफराबाद रोडवरील कुप्रसिद्ध बायपास चौफुल्लीवर ११ डिसेंबरला पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. बोलेरो पिकअपला एसटी बसची जोरदार धडक बसून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारांसाठी जालना येथे हलविण्यात आले.

कसा झाला अपघात?

सकाळी अंदाजे ८ वाजता आदित्य वाईन बारजवळ बोलेरो पिकअप (MH 38-2082) मध्ये मजूर बसत होते. त्याचवेळी जाफराबादहून जालना दिशेने जाणारी एसटी बस (MH 20 BL 2276) अतिवेगाने व निष्काळजीपणे चालवली गेल्याने तिने बोलेरोला जबर धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की बोलेरोमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.

मृत महिलांची नावे :

रिचाय काल्या कासदेकर (७२), रा. बुरहानपूर (म.प्र.)

मायाबाई सुरज काजले (४०), रा. बुरहानपूर (म.प्र.)

जखमी झालेल्या तिघांना प्रथम देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना जालना येथे हलविण्याचा सल्ला दिला.

चौक बनला ‘मृत्यूचा सापळा’
या बायपास चौफुल्लीवर गेल्या अनेक वर्षांपासून सतत अपघात घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वाहतूकनियोजनाचा अभाव, सिग्नल नसणे, वेगमर्यादा नियंत्रणाचा अभाव – या कारणांमुळे हा चौक अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ ठरतो आहे.

अपघातानंतर देऊळगाव राजा पोस्टेचे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलविले. मजूर हे परप्रांतीय असल्याची चर्चा केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त करत, या चौकावर आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन कारवाई करणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!