चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप आणि गरीब कुटुंबांचे अनुदान थकवल्याच्या आरोपावरून युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर आणि विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख ओमराजे गायकवाड यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देत प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात तांदूळ व ज्वारीचे अत्यंत निकृष्ट धान्य वाटप करण्यात आले.“हे धान्य जनावरांनाही खाण्यायोग्य नाही, मग ते नागरिकांना कसे देता?” असा सवाल पदाधिकाऱ्यांनी केला.या प्रकरणात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप आहे.
याशिवाय, तीन वर्षांपूर्वी पुरवठा विभागाने काही गरीब कुटुंबांकडून “धान्याऐवजी पैसे मिळतील” असे सांगून फॉर्म भरून घेतले. परंतु न पैसे मिळाले, न धान्य, यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली असून ते सतत कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत.
या सर्व समस्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.कारवाई न झाल्यास २३ डिसेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही युवा सेनेने दिला आहे….
















