मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका ४० वर्षीय महिलेस जबर धडक दिली. वाहनाखाली चिरडल्या गेल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना ३० नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास तालखेड फाट्याजवळ घडली. प्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील डिडोळा बुद्रुक येथील स्वप्नील अशोक श्रीनाथ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची नळगंगा फाटा येथे श्रीनाथ हॉटेल आहे. ३० नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एक ४० वर्षीय गतिमंद महिला ही हॉटेल समोरून जाताना दिसून आली. यावेळी फिर्यादीने त्यांना कुठे जात आहे, असे विचारले असता त्यांनी खंडोबाचा नवस आहे, असे म्हणत मलकापूरच्या दिशेने निघून गेली. दरम्यान, रात्री अकरा वाजता तालखेड फाट्याजवळ अपघात झाल्याची माहिती फिर्यादीला मिळाली. त्यामुळे फिर्यादीने त्याठिकाणी जाऊन पाहिले असता अनोळखी महिला मृतावस्थेत दिसून आली. कोणीतरी अज्ञात वाहन चालकाने भरधाव तथा निष्काळजीपणे वाहन चालवून महिलेस घडक दिल्याने तिचा मृत्यू झाला.
या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सीताराम मेहेत्रे, पीएसआय राजेंद्र कपले, पोहेकॉ सुपडासिंग चव्हाण, चालक मनोहर पंडीत यांनी घटनास्थळी धाव घेतली असता अपघातात त्या महिलेचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी मृतदेह बुलडाणा येथील शवागृहात ठेवला असून मृत महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे











