चिखलीत मविआला मिळाले बळ ! अपक्ष उमेदवार सादिक खान यांचा काशिनाथआप्पा बोंद्रे यांना जाहीर पाठिंबा…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ विश्वंभरआप्पा बोंद्रे यांच्या बाजूने घडामोडी अधिकच अनुकूल होत आहेत. नगरपरिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले, समाजात प्रभावी मानले जाणारे सादिक खान अजीज खान यांनी महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा करत निवडणुकीत मोठे राजकीय वळण निर्माण केले.

चिखलीत अल्पसंख्याक मतदारांमध्ये, सामाजिक संघटनांमध्ये सादिक खान यांचा मजबूत प्रभाव आहे. ते स्वतः नगरपरिषद निवडणुकीत अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले होते. मात्र शहरहित आणि स्थिर नेतृत्वाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी काशिनाथआप्पा बोंद्रे यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जाहीर पत्रातून स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, शहराच्या विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. काशिनाथआप्पा बोंद्रे हे सर्वसमावेशक नेतृत्व देऊ शकणारे उमेदवार आहेत. मतदारांनी त्यांच्या पंजा निशाणी समोरील बटन दाबावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

महाविकास आघाडी आणखी भक्कम सादिक खान यांचा पाठिंबा जाहीर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मुस्लिम समाजाचा पाठिंबा अधिक मजबूत झाला आहे. आधीच शहरभरात महाविकास आघाडीच्या सभा, पदयात्रा आणि कॉर्नर मीटिंग्जना प्रचंड प्रतिसाद मिळत असताना हा पाठिंबा म्हणजे बोंद्रे यांच्या प्रचारात नवचैतन्य भरल्यासारखे आहे. प्रत्येक प्रभागात वाढलेली गर्दी, महिलांचा सक्रिय सहभाग आणि तरुणांचे समर्थन या सर्वांचा परिणाम या निर्णयाने अधिक ठळक होईल, असा अंदाज व्यक्त केला जातो.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!