मलकापूर पांग्रा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – मलकापूर पांग्रा येथून जवळच असलेल्या ढोरवी येथे काळ्या जादूचे अघोरी प्रयोग वाढत चालले आहेत मागील काही दिवसांपासून गावात सलगपणे अघोरी जादूचे लिंबू बाहुली सुया आदी साहित्य आढळत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
काही दिवसांपूर्वी ढोरवी गावातून शेतामध्ये जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडावर काळ्या बाहुल्या, गोटे आणि खिळे ठोकलेले असल्याचे निदर्शनास आले. यानंतर गावालगत असलेल्या महारुकाच्या झाडाची अमावस्येच्या रात्री अज्ञात व्यक्तीने पूजा केली असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. गावातील शांततेला न बसणाऱ्या या घटनांनी ग्रामस्थ चिंतीत झाले आहेत.
ही घटना ताजी असतानाच आणखी गुरुवारी आलेल्या अमावस्येच्या दिवशी गावातील एका दुकानात पुन्हा एकदा अघोरी साहित्य आढळले. अज्ञात व्यक्तीने काळी बाहुली, खिळे, गोटे, लिंबू आणि चपलांचे कातडे बांधून दुकानात टाकल्याचे आढळताच गावात एकच खळबळ माजली. हा प्रकार पत्रकार ज्ञानेश्वर कळकुंबे, गजानन मुरकुट, शुभम मुरकुट, शिवानंद शेळके, धनंजय मुरकुट व इतरांच्या निदर्शनास आला. त्यानंतर या घटनेने गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे या घटनांतून एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून भीती पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा गावात सुरू झाली आहे.
दरम्यान पत्रकार ज्ञानेश्वर कळकुंबे यांनी हे पूजेचे आघोरी साहित्य जाळून टाकले त्यामुळे लोकांच्या मनातील भीती जरा थोडी कमी झाली
गावातील नागरिकांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटनांची तातडीने चौकशी करून दोषींना शोधून कठोर कारवाई करावी. अघोरी साहित्याचा वाढता क्रम, अमावस्येला घडलेली पुनरावृत्ती आणि गावकऱ्यांच्या मनातील वाढती असुरक्षितता पाहता यावर त्वरीत उपाययोजना होणे आवश्यक आहे.
गावातील रहिवासी रमेश पिंपळे यांनी सांगितले की, काही टवाळखोर व्यक्ती अशा कृती करून गावातील शांतता भंग करत आहेत आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. या सर्व घटनांमुळे ढोरवी परिसरातील वातावरण ढवळून निघाले असून प्रशासनाने तातडीने तपास करून गावकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.













