चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – दोन दिवस राहिले तरी चिखली मध्ये युती आघाडी कडून उमेदवारी जाहीर झाली नाही त्यामुळे कार्यकर्ते मध्ये आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, नगराध्यक्ष पदासाठी गुडघ्याला बाशिंग बाधून अनेक जण बसले आहे. अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोन दिवस उरले आहे त्यामुळे आता पुढे काय होणार? आता चिखलीत बंड होतो की बंड थंड करण्याचे कसब नेत्यांना करावे लागणार आहे. २ डिसेंबरला होणाऱ्या चिखली नगरपालिका निवडणुकीची जोरदार लगबग सुरू झाली असून, सर्वच पक्षांमध्ये उमेदवार निवडीची धांदल माजली आहे. उमेदवारांची नावं अद्यापही गुप्तच असल्याने नेत्यांची चुळबुळ वाढली आहे. शहरातील राजकीय वातावरण तापले असून पक्षांच्या बैठकांना आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीला अक्षरशः उधाण आले आहे.नगराध्यक्ष पद थेट जनतेतून निवडायचे असल्याने योग्य, लोकप्रिय आणि आर्थिकदृष्ट्या समर्थ असा चेहरा शोधताना नेते अक्षरशः चक्रावले आहेत. काँग्रेस आणि भाजप दोन्हीकडे नगरसेवकपदासाठी इच्छुकांची रांग वाढल्याने तिकिट वाटपात गोंधळ, नाराजी आणि गटतट उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या पाच वर्षांत पक्षासाठी काम केलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची की नव्या आणि प्रभावी कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचे, या प्रश्नानेच दोन्ही पक्षांच्या नेत्यांची पंचाईत झाली आहे.त्याच्या उलट भाजपाची हालचाल मात्र शांत, संयमित आणि गुप्त ठेवलेली दिसते. कोणतेही राजकीय पत्ते उघड न करताच भाजप प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकत आहे. त्यामुळे भाजप नेमका कोणता निर्णय घेणार, याचा अंदाज राजकीय जाणकारांनाही लावणे कठीण झाले आहे.राजकीय वर्तुळात अशी चर्चाही सुरू आहे की—काँग्रेसमध्ये निर्माण होऊ शकणारा गटतट आणि बंडखोरीचा सूर जर उफाळला, तर त्याचा थेट फायदा भाजपाला होऊ शकतो.अशा परिस्थितीत चिखली नगरपरिषद निवडणूक अधिकच रंजक व अनिश्चित बनली आहे. शेवटी ‘नगरपालिका गड’ नेमका कुणाच्या हातात जाणार? हाच प्रश्न आता संपूर्ण शहरात चर्चेत आहे.
SPECIAL POLITICAL : चिखली नगरपरिषद निवडणूक : उमेदवारीमधील गोंधळ आद्यपही कायम; बंडखोरीच्या भीतीने दोन्ही पक्ष उमेदवारी जाहीर करण्यास कचरत..!














