खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पतीनेही तिसऱ्या दिवसी अखेरचा श्वास घेतला आहे. ही घटना शहरातील हिरानगर भागात घडली.
शहरातील हिरानगर येथील रहिवासी विमलबाई सूर्यभान राऊत या रुग्णालयात दाखल असलेले त्यांचे पती सूर्यभान राऊत यांना पाहण्यासाठी गेले असता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. २९ ऑक्टोबर रोजी मृत्यू झालेल्या विमलबाईंवर ३० ऑक्टोबर रोजी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, ३१ ऑक्टोबरच्या रात्री रुग्णालयात

उपचार घेत असलेले सूर्यभान राऊत यांचाही मृत्यू झाला. तर दुसरी घटना याच भागात घडली. प्रतिभा गणेश काटोले या पतीसह दुचाकीवर जात असताना शेगाव- संग्रामपूर मार्गावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. गंभीर जखमी झालेल्या प्रतिभा काटोले यांच्यावर अकोला येथे उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज १ नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच याच भागातील भोपाळ येथे लग्न होवून गेलेली मधुकर बागल यांची मुलगी दुर्गा श्रीकृष्ण कुचेकर हिचाही हृदय विकाराने काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. चौघांच्या मृत्युमुळे त्यांच्या कुटुंबियांसह हिरानगर भागात शोककळा पसरली आहे.











