डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर आणि लोणार तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आज डोणगाव दौऱ्यावर आले. मात्र त्यांनी केवळ १४ मिनिटांत दौरा आटोपल्याने आणि फक्त एका शेताची पाहणी केल्याने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सध्या सोशल मीडियावर “फक्त एकाच शेताची पाहणी केली” अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत असून, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी पालकमंत्र्यांच्या दौऱ्याचा निषेध नोंदवला आहे. त्यांनी म्हटले की, “जसा पाऊस अचानक आला, तसाच पालकमंत्र्यांचा दौरा सुद्धा अचानकच झाला. शेतकऱ्यांच्या दु:खावर फक्त औपचारिकता झाली.”
दरम्यान, याआधी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमूलकर आणि काँग्रेस नेते सिद्धार्थ खरात यांनी तीन दिवसीय दौरे करून प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली होती व शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले होते.
आज अचानक पालकमंत्री मकरंद पाटील हे २.२८ वाजता डोणगावात आले आणि २.४२ वाजता ताफ्यासह बुलडाण्याकडे रवाना झाले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. पोलिस व महसूल कर्मचाऱ्यांची अचानक धावपळ झाली. या दौऱ्यावरून जनतेमध्ये नाराजीचा सूर असून, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.