बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजनेचा २० वा हप्ता आज, २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, याला केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील, आमदार संजय गायकवाड आणि आमदार धीरज लिंगाडे यांचीही उपस्थिती राहणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची मदत तीन टप्प्यांत (प्रत्येकी २,००० रुपये) दिली जाते. आतापर्यंत १९ हप्ते वितरित करण्यात आले असून, आज २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, या उपक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्रात करण्यात येणार आहे.