चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा जिल्ह्यात भाजप पक्षाची नव्याने जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नवखे व दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना संधी दिल्याचं स्पष्ट दिसत आहे. मात्र, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे, संकटाच्या काळात देखील भाजपची पताका उंचावणारे जुने निष्ठावंत कार्यकर्ते मात्र यावेळी दुर्लक्षित झाल्याचे चित्र आहे.
नवख्या चेहऱ्यांना अधिक मान…
नवीन कार्यकारणीमध्ये अनेक अशा चेहऱ्यांचा समावेश आहे जे अलिकडेच पक्षात आले आहेत. काही जण तर इतर पक्षांमधून भाजपमध्ये प्रवेश करून थेट पदांवर विराजमान झाले आहेत. त्यामुळे पक्षाचे जुने, परिश्रमी व निष्ठावान कार्यकर्ते नाराज झाल्याचं बोललं जात आहे.
ज्यांनी संकटकाळात साथ दिली, ते आज वाऱ्यावर…
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेस, जेव्हा पक्षावर कठीण प्रसंग होते, तेव्हा या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून पक्षासाठी काम केलं. अनेक गावांमध्ये तोंडावर विरोध सहन करत भाजपचं काम तळागाळात पोहोचवलं. मात्र आज जेव्हा सत्तेची फळं वाटण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनाच डावललं गेलं आहे.
राजकीय उलथापालथीचा परिणाम?
राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक मोठे विरोधी नेते आता भाजपमध्ये सामील होत आहेत. साहजिकच, अशा ‘बड्या’ नेत्यांना सन्माननीय पदं देण्यात येतात. पण त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांची घोर उपेक्षा होते आहे, अशी चर्चा आता गावोगाव रंगत आहे.
पक्षात नाराजीचं वातावरण…
या निर्णयामुळे भाजपच्या अंतर्गत वर्तुळात नाराजीचं वातावरण आहे. काही कार्यकर्ते आघाडीवर असले तरी अनेक जण या निवडींमुळे खंत व्यक्त करत आहेत. “आम्ही पक्षासाठी जीव तोडून काम केलं, पण आता आमची किंमत उरली नाही,” असं म्हणणारे कार्यकर्ते आता खाजगी मध्ये आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
संधी कुणाला – न्याय कुणाला?
भाजप नेतृत्वाने ही स्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण, पक्ष हे फक्त पद देऊन चालत नाही, तर कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर उभा असतो. जर ही निष्ठाच डगमगली, तर पक्षाची मूळ ताकदच कमकुवत होईल.
1 thought on “भाजपमध्ये नवख्या चेहऱ्यांना झुकते माप, निष्ठावान कार्यकर्ते मात्र दुर्लक्षित! ज्यांनी संकटकाळात साथ दिली, ते आज वाऱ्यावर…संधी कुणाला – न्याय कुणाला?”