बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख काम करणारा अधिकारी नेहमीच जनतेच्या मनात स्थान मिळवतो. जनतेच्या सहभागाशिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखणे कठीण आहे. आपले कर्तव्य पार पाडताना लोकांशी समन्वय साधला, तर यश नक्कीच मिळते, असे मत अप्पर पोलिस अधीक्षक बी.बी. महामुने यांनी व्यक्त केले. बुलढाण्यातील आपला कार्यकाळ पूर्ण करून श्री. महामुने यांची रत्नागिरी येथे बदली झाली आहे. या बदलीपूर्वी त्यांनी बुलढाणा येथील पत्रकारांशी स्नेहभेट घेतली. या भेटीत त्यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभवांना उजाळा देत पत्रकार आणि पोलिस यांच्यामधील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
जिल्हा पत्रकार भवनात शुक्रवारी (11 जुलै 2025) झालेल्या या स्नेहभेटीत श्री. महामुनी यांनी सांगितले की, पत्रकार आणि पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास यशस्वी झाला. “पत्रकार हे समाजाचा आरसा असतात. त्यांनी पोलिसांची प्रतिमा लोकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचवली. बुलढाण्यातील पत्रकारांनी कधीही आपला धर्म सोडला नाही. त्यामुळे पोलिसांना कर्तव्याच्या मार्गावर ठाम राहण्यास मदत झाली,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी त्यांनी बुलढाण्यातील जनतेच्या सहकार्याबद्दल आणि प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी श्री. महामुने यांचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे बुलढाणा जिल्हा मार्गदर्शक भानुदास लकडे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक राजेश डिडोळकर, परिषद प्रतिनिधी नितीन शिरसाठ, प्रदेश प्रतिनिधी गणेश निकम, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष वसीम शेख, सचिव शिवाजी मामनकर, कोषाध्यक्ष ब्रम्हानंद जाधव, विभागीय संघटक रहेमत अली शहा, लक्ष्मण दंदाले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री. महामुने यांनी आपल्या कार्यकाळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने लोकांशी संवाद साधला. त्यांच्या या लोकाभिमुख कार्यशैलीमुळे त्यांनी बुलढाण्यातील जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आता रत्नागिरी येथे नव्या जबाबदारीसाठी जाताना त्यांनी बुलढाण्याच्या आठवणी आणि येथील लोकांचे प्रेम आपल्या हृदयात कायम ठेवणार असल्याचे सांगितले.














1 thought on “लोकाभिमुख कामामुळे जनतेच्या मनात स्थान – अप्पर पोलिस अधीक्षक बी.बी. महामुने”