देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा तालुक्यातील पांगरी माळी शिवारात सोमवारी (१ जुलै) रात्री एक दुर्दैवी घटना घडली. गोठ्यावरील पत्र्याचे छप्पर आणि लोखंडी अँगल कोसळून शेतकरी विलास विठ्ठल सोनुने (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या दोन बकऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेहमीप्रमाणे विलास सोनुने रात्री झोपण्यासाठी बकऱ्यांच्या गोठ्यात गेले होते. रात्री अचानक गोठ्याचे छप्पर व अँगल कोसळले आणि त्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रात्री उशिरा प्रकाश सोनुने यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ विलास यांचे बंधू अवचित सोनुने आणि त्यांचा मुलगा यांना कळवले. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना तातडीने देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून झाली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहेत.
विलास सोनुने यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले व कुटुंबीय असा परिवार आहे.














