दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्यूज): जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथून अपहरण झालेल्या एका तरुणाची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह बुलडाणा जिल्ह्यातील तढेगाव-टाकरखेड वायाळ रस्त्यावर फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी याप्रकरणी तपास तीव्र केला आहे.
काल सकाळी तढेगाव-टाकरखेड वायाळ रस्त्यावर एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला. तढेगाव गावचे पोलिस पाटील गजानन फुके यांनी याबाबत तातडीने किनगाव राजा पोलिसांना माहिती दिली. प्रथमदर्शनी ही हत्या क्रूरपणे केल्याचे दिसून आले असून, मृतदेह अन्यत्र ठार मारून येथे आणून टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. किनगाव राजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले.
तपासादरम्यान, जालना जिल्ह्यातील घनसावंगी पोलीस ठाण्यात यापूर्वीच एका तरुणाच्या अपहरणाची तक्रार नोंदवली गेल्याचे समोर आले. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृत व्यक्तीचे नाव सुरेश तुकाराम आर्दड (वय ३३, रा. राजाटाकळी, ता. घनसावंगी) असे आहे. सुरेश यांच्या वडिलांनी मृतदेहाची पाहणी करून त्याची पुष्टी केली. यानंतर सुरेश यांचा चुलत भाऊ सुभाष आर्दड यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (२८ जून २०२५) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. सुरेश आर्दड यांचे अपहरण गावठी पिस्तूल आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवत करण्यात आले. त्यानंतर त्याला एका चारचाकी वाहनातून अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. तिथे त्याची हत्या करून मृतदेह बुलडाणा जिल्ह्यातील तढेगाव-टाकरखेड वायाळ रस्त्यावर फेकण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी हरी कल्याण तौर, सखाराम ऊर्फ खन्ना बप्पासाहेब आर्दड (दोघे रा. राजाटाकळी), मिनाज बाबामिया सय्यद (रा. कुंभार पिंपळगाव) आणि एका अज्ञात चारचाकी वाहन चालकाविरुद्ध अपहरण, खून आणि शस्त्रबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
2 thoughts on “जालना येथील तरुणाची अपहरणानंतर क्रूर हत्या; मृतदेह बुलडाणा जिल्ह्यात फेकला”