अमोना (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथील शेतकरी एकनाथ तुकाराम शिंदे यांच्या शेतामध्ये वीज कोसळून त्यांची एक म्हैस जागीच मरण पावल्याची दुर्दैवी घटना आज, 18 मे रोजी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान घडली.
शिंदे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली म्हैस बांधलेली होती. त्यावेळी जोरदार पाऊस सुरू होता आणि अचानक विजेचा मोठा कडकडाट झाला. विजेचा धक्का इतका जोरदार होता की 80 ते 90 हजार रुपये किंमतीची म्हैस जागीच ठार झाली. ही घटना त्यांच्या घरापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर घडली. सुदैवाने, शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित आहेत.
एकनाथ शिंदे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांच्यासाठी ही म्हैस उपजीविकेचा मोठा आधार होती. आता तिचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य तो आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी परिसरातून केली जात आहे.