गंगापूर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): लासूर स्टेशन परिसरात एका ५५ वर्षांच्या व्यक्तीने अवघ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिल्लेगाव पोलिसांनी नवरदेवासह मुलीचे वडील, नातेवाईक आणि भटजीसह एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगवान बाबाजी भालेराव (वय ५५, रा. लासूरस्टेशन) या व्यक्तीने वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील १६ वर्षांच्या मुलीसोबत २८ एप्रिल २०२५ रोजी डोणगाव रोडवरील महादेव मंदिरात विवाह केला.ही माहिती ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर मुकणे यांना चाइल्ड हेल्पलाइनकडून प्राप्त झाली. त्यांनी याची चौकशी केली असता मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे मुलीचे वडील, काही नातेवाईक, तसेच विवाह लावणारा भटजी यांच्यासह १३ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई प्रभारी प्रकल्प समन्वयक आम्रपाली बोर्डे, बाल संरक्षण अधिकारी दीपक बाजारे, आणि पोलीस अंमलदार कौतिकराव सुरडकर यांच्या पथकाने केली. सध्या याप्रकरणाचा अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करत आहेत.
1 thought on “कमालच झाली…! ५५ वर्षांच्या म्हाताऱ्याचे १६ वर्षांच्या मुली सोबत…; १३ जणांवर गुन्हा दाखल!”