मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) पत्नीच्या चुलत भावांकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून एका ५० वर्षीय व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वडगाव खंडोपंत येथे १८ नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.फिर्यादी अलका रवींद्र शेळके (रा. फुली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांच्या चुलत भावांनी—अमोल राजाराम सरोदे आणि गणेश राजाराम सरोदे (दोन्ही रा. फुली)—शेतीच्या कारणावरून त्यांच्याशी व त्यांच्या पती रवींद्र शेळके यांच्याशी वाद घातला. या वादादरम्यान दोघांनी शिवीगाळ, लोट पाट करत चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. अमोल सरोदे याने काठीनेही मारहाण केली व अपमानास्पद शब्दांत बोलत जीवे मारण्याची धमकी दिली.या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे त्रस्त होऊन रवींद्र शेळके यांनी १८ नोव्हेंबर रोजी वडगाव खंडोपंत येथील नळगंगा नदीपात्राशेजारील सरकारी विहिरीजवळ विषारी द्रव्य प्राशन केले. सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमोल सरोदे आणि गणेश सरोदे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी त्यांना ताब्यात घेतले.
सततच्या त्रासाला कंटाळून ५० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल













