मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज):प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी मोताळा तालुक्यातील मोहेगाव जिल्हा परिषद शाळेत हृदयद्रावक घटना घडली. झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अवघ्याच काही क्षणांत मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे दुःखद निधन झाले.
खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथील रहिवासी दिलीप हिरालाल राठोड (वय ५७) हे मोहेगाव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. सोमवार, २६ जानेवारी रोजी सकाळी शाळेत झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्यानंतर राठोड हे शाळेच्या कार्यालयात खुर्चीवर बसले असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
क्षणातच प्रकृती खालावल्याने सहकारी शिक्षकांनी त्यांना हलवून पाहिले; मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तातडीने त्यांना उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे शाळा परिसरात शोककळा पसरली असून शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. राठोड हे मनमिळावू, कर्तव्यनिष्ठ व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते.












