
वळती: गावात आज पडलेल्या पावसाने वळती ग्रामपंचायतीच्या नालीमुक्त शोष खड्डा योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत, तर गल्लीबोळांत घाणीचे डोह साचल्याने रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षी मोठ्या धडाक्यात ग्रामपंचायतीने नालीमुक्त योजना राबवली होती. मात्र, योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. काही गल्ल्यांमध्ये घाईगडबडीत सिमेंट रस्त्याखाली शोष खड्डे योजना दाबण्यात अली, तर काही ठिकाणी गरजेपेक्षा कमी खड्डे करून खर्चाची उधळपट्टी करण्यात आली. ज्या भागात १५-२० खड्ड्यांची आवश्यकता होती, तेथे केवळ ४-५ खड्ड्यांमध्येच योजना गुंडाळण्यात आली. परिणामी, पावसाचे पाणी योग्य प्रकारे जिरत नसून रस्त्यावर साचत आहे.
भ्रष्टाचार उघड करण्यासाठी नागरिकांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज दिले असता, माहिती देण्यास पण टाळाटाळ करण्यात येत आहे. यावरून खूप मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हे पण वाचा- वळती ग्रामपंचायतीत आर्थिक गोंधळ? हजारांचे काम, लाखोंची बिले! अन माहिती देण्यास टाळाटाळ…
नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार केली असता, ग्रामपंचायत निधीअभावी काहीच करू शकत नसल्याचे सांगण्यात आले. घरपट्टी वसुली शून्य टक्के असल्याचे कारण ग्रामपंचायतीकडून देण्यात येत आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने कामे झाल्यामुळे गावातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
गावकऱ्यांनी आता ग्रामपंचायतीच्या या हलगर्जी कारभाराविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा, पुढील पावसाळ्यातही नागरिकांना याच समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
– बुलढाणा कव्हरेज न्यूज