बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात २५ फेब्रुवारी २०२० रोजी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत अल्पवयीन तरुणीवर विनयभंग, तिच्या कुटुंबियांना मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी तिघा आरोपींना विशेष न्यायालयाने दोषी ठरवत कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून विशेष सरकारी वकील अड. संतोष खत्री यांनी न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांवरून बुधवार, २३ जुलै २०२५ रोजी हा निकाल देण्यात आला.
घटनेच्या दिवशी पीडित तरुणी गावातील तलावावर धुणे धुण्यासाठी गेली असताना आरोपी अशोक समाधान मगर याने ती एकटी असल्याचे पाहून तिच्यावर प्रेम व्यक्त करत तिचा विनयभंग केला. घाबरलेली तरुणी घरी परतली आणि तिने ही घटना आपल्या वडिलांना सांगितली. काही वेळानंतर आरोपी अशोक हा पीडितेच्या घरी आला आणि तिच्या वडिलांना व भावांना शिवीगाळ करू लागला. यावेळी पीडितेचे वडील आणि आजी लिलाबाई यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशोक याने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्याने पीडितेच्या वडिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि डोक्यावर दगड मारून जखमी केले.
या घटनेत अशोक याला त्याचे वडील तुकाराम आणि आई गीता समाधान मगर यांनी साथ दिली. त्यांनी पीडितेच्या आजी लिलाबाई यांना लोटपाट करून, चापट्या-बुक्क्यांनी मारहाण केली. याशिवाय, गीता मगर हिने हातातील विटेने लिलाबाई यांच्या गालावर मारहाण केली. या तिघांनी पीडितेच्या कुटुंबाला “आमच्या नादाला लागलात तर कोणालाही जिवाने मारून टाकू,” अशी धमकी दिली.
या घटनेनंतर पीडितेने तिचे वडील आणि आजीसह बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ४१/२०२० अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ३५४-अ, ३२३, ३२४, ५०४, ५०६ आणि कलम ३४ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एम. एन. सातदिवे यांनी केला. तपासात पुरेसे पुरावे मिळाल्याने विशेष न्यायालय, बुलढाणा येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
विशेष सरकारी वकील अड. संतोष खत्री यांनी या प्रकरणात सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासले. त्यांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या पुराव्यांद्वारे पीडिता अल्पवयीन असल्याचे आणि आरोपींनी तिचा विनयभंग करून तिच्या कुटुंबियांना मारहाण व धमकी दिल्याचे सिद्ध केले. त्यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:
- आरोपी अशोक समाधान मगर:
- पोक्सो कायद्याच्या कलम ८ अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास आणि २,००० रुपये दंड; दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावास.
- भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास आणि १,००० रुपये दंड; दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास.
- भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास आणि १,००० रुपये दंड; दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास.
- आरोपी समाधान तुकाराम मगर आणि गीता समाधान मगर:
- भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास आणि १,००० रुपये दंड; दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास.
- भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास आणि १,००० रुपये दंड; दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास.
या खटल्यात विशेष सरकारी वकील अड. खत्री यांना पोलीस हवालदार थोरात, बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सहकार्य केले. या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला असून, समाजात अशा गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.