चिखलीतील वीर सावरकर नगरातील नालीच्या दुरवस्थेमुळे स्थानिक रहिवासी त्रस्थ; प्रशासनाचे दुर्लक्ष

चिखलीतील वीर सावरकर नगरातील नालीच्या दुरवस्थेमुळे स्थानिक रहिवासी त्रस्थ; प्रशासनाचे दुर्लक्ष

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरातील वीर सावरकर नगर परिसरातील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून नालीच्या दुरवस्थेमुळे त्रस्त आहेत. यासंदर्भात स्थानिक रहिवासी संतोष गवारे पाटील यांनी चिखली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे १ जून २०२५ रोजी निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी महाराणा प्रताप शाळेजवळ आणि गजानन जाधव यांच्या घरासमोरील नालीच्या दयनीय अवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

सदर नाली गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेली असून, ती पूर्णपणे खराब झाली आहे. नाली खचलेली आणि तुटलेली असल्याने ती पूर्णपणे निकामी झाली आहे. यामुळे नालीत कचरा आणि सांडपाणी साचले आहे, ज्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यातून डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, रहिवाशांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. शिवाय, रस्त्याच्या कडेला असलेली खराब नालीमुळे दुचाकी वाहने किंवा पादचारी गटारात पडण्याचा धोका आहे. यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनावर राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

चिखलीतील ब्रिटिशकालीन इमारत पाडकाम प्रकरणी ठिय्या आंदोलन; दोषींवर कारवाईची मागणी!

संतोष गवारे पाटील यांनी निवेदनात काही ठोस मागण्या मांडल्या आहेत. त्यात नालीची तातडीने पाहणी करणे, नालीतील साचलेला कचरा आणि सांडपाणी त्वरित स्वच्छ करणे, पाणी साचणार नाही यासाठी योग्य उतार आणि झाकणाची व्यवस्था करणे, तिचे नव्याने बांधकाम करणे आणि परिसरात औषध फवारणी करणे यांचा समावेश आहे. या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही व्हावी, अशी विनंती रहिवाशांनी केली आहे.

निवेदन सादर करताना संतोष गवारे पाटील यांच्यासह वीर सावरकर नगरातील अनिल वानखेडे, भागवत वानखेडे, हर्षल वानखेडे, गणेश हाडे, अलका जाधव, गजानन जाधव, निशांत जाधव, संजय निकाळजे, साधना निकाळजे, रेणुका निकाळजे, रसिका निकाळजे, रिंकू निकाळजे, हर्षल सोनवणे, पुष्पा पाखरे, उषा मांडवकर, पंचफुला लहाने, गीता तोंडल, अनिल झाल्टे, लता झाल्टे, दत्ता बकाल, केशरबाई पाटील, गणेश शिंगणे, राधाबाई जाधव, गजानन गाडगे, हर्षल लोखंडे, शीतल उबाळे आणि इतर रहिवासी उपस्थित होते. मुख्याधिकारी यांनी निवेदन स्वीकारत लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

रहिवाशांनी या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ही समस्या दीर्घकाळापासून प्रलंबित आहे, आणि आता ती सोडवण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!