मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यात १२ जून रोजी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसात विजेचा मोठा तडाखा बसला. मोताळा तालुक्यातील शेलापूर शिवारात विजेचा स्फोट होऊन तब्बल १७ पाळीव जनावरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मेंढपाळांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, वीज कोसळल्याने ओंकार नारायण वाघ, निना नारायण वाघ आणि सुधाकर भिकाजी बोरसे या तिघा मेंढपाळांच्या शेळ्या व मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना १२ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून यासंदर्भातील अधिकृत माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने १३ जून रोजी दिली आहे. सध्या या घटनेबाबत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून, नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
इतर भागांमध्येही वादळाचा फटका
जिल्ह्यातील काही इतर भागांमध्येही वादळी वाऱ्यांमुळे झाडे आणि विजेचे खांब पडले आहेत. परिणामी, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीकडून तातडीने दुरुस्तीचे काम सुरू आहे.
मेंढपाळांचे मोठे नुकसान
या नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याने मेंढपाळांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.














