तहसीलदार अजित दिवटे यांच्या तत्परतेमुळे शेत रस्ता खुला; शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लाट!

सिंदखेड राजा (सचिन खंडारे-बुलडाणा कव्हरेज न्युज): शेती मशागतीचे दिवस सुरु असताना शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीचा रस्ता बंद झाल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्ते अडवले जात होते, तर काही ठिकाणी जाणूनबुजून रस्ता अडवल्याचे प्रकार समोर येत होते.

याच पार्श्वभूमीवर दिनांक ६ जून रोजी सिंदखेडराजा येथील ३० ते ४० शेतकरी अचानक तहसील कार्यालयात पोहोचले. “आमचा शेत रस्ता अडवला गेला असून, मशागत व पेरणीसाठी शेतात जाण्यास रस्ता नाही,” अशी तक्रार त्यांनी तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे केली.

तत्काळ निर्णय, थेट बांधावर भेट!

शेतकऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत तहसीलदार दिवटे यांनी कोणताही वेळ न दवडता थेट शेतकऱ्यांसोबत संबंधित ठिकाणी भेट दिली. सिंदखेडराजा भाग दोनमधील सर्वे नंबर २२९, २३०, २३१ आणि अन्य शिवारातील हा रस्ता तब्बल ६० वर्षांपासून वहिवाटीचा होता.

मात्र काही गैरअर्जदारांनी या रस्त्यावर जेसीबीने माती टाकून जाणता-पणाने रस्ता अडवला होता.

चर्चा व तोडगा; शेवटी रस्ता खुला!

तहसीलदार दिवटे यांनी अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधून दोन्ही बाजूंनी चर्चा घडवून आणली. चर्चेनंतर तहसील प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे अखेर रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला.

शेतकऱ्यांचे आभार…

शेतीच्या तातडीच्या कामासाठी रस्ता मोकळा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार अजित दिवटे यांचे विशेष आभार मानले. वेळेवर हस्तक्षेप करून शेतकऱ्यांची अडचण सोडवल्यामुळे त्यांच्या कामास गती मिळाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!