आ. श्वेताताई महाले यांच्या विकासकामांच्या जोरावर चिखली नगरपालिकेत भाजपचे पंडितराव देशमुख मारणार बाजी…!

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज)नगरपालिका निवडणुक विकासाच्या मुद्द्यावर आधारित असून, विद्यमान आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी गेल्या सहा वर्षांत केलेल्या अभूतपूर्व विकासकामांच्या जोरावर भाजप चिखली नगरपालिकेच्या निवडणुकीत बाजी मारणार असुन पंडितराव देशमुख यांना मोठ्या मताधिक्याने नगरपालिकेत पाठवायचा निर्धार शहरातील मतदारांनी केल्याचे दिसून येत आहे. आमदार महाले यांना त्यांनी केलेल्या विकासकामाच्या बळावर ‘विकासकन्या’ ही उपाधी मिळाली असून, त्यांच्या कामांचा थेट फायदा आता भाजपच्या नगरपालिकेतील उमेदवारांना होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
शहराची वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाचा वेग लक्षात घेता, गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांची मुख्य मागणी पिण्याचे पाणी, रस्ते आणि भूमिगत नाल्यांच्या बांधकामाची होती. अनेक ठिकाणी रस्त्यांचा अभाव आणि सांडपाण्याच्या निचऱ्याची गंभीर समस्या होती. मात्र, आमदार महाले यांनी आमदार झाल्यानंतर या मूलभूत समस्यांवर तातडीने लक्ष केंद्रित केले. आज शहरात जवळपास सर्वत्र रस्ते आणि नाल्यांची कामे पूर्णत्वास आली असून, याच विकासकामांना आधार मानून नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल असा ठाम विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. शहरातील नागरिकांची रस्ते आणि नाल्यांची मागणी महाले यांनी पूर्ण केल्याने हेच विकासकामे आता भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारे ठरणार आहेत.
राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे शहराच्या विकासासाठी आमदार श्वेताताई महाले ह्या मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणू शकतील असा ठाम विश्वास शहरातील नागरिकांना आहे. विकासाच्या या गतीला कायम ठेवण्यासाठी आणि उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी नगरपालिकेतही भाजपची सत्ता असणे आवश्यक आहे अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. याच विश्वासातून त्यांनी भाजपचे उमेदवार पंडितराव देशमुख यांना नगरपालिकेत पाठवण्याचा निर्धार केल्याचे दिसुन येत आहे.भाजपची सत्ता नगरपालिकेत आल्यास, उर्वरित विकासाची कामे, पिण्याचे पाणी, आरोग्य आणि प्राथमिक सोईसुविधा देखील युद्धपातळीवर पूर्ण होतील, असा विश्वास शहरवासीयांना वाटत आहे.
मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि नागरिकांना मिळाला शहर विकासाचा विश्वास
निधीची चिंता नाही….
नुकतीच या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत त्यांनी चिखली शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची स्पष्ट ग्वाही दिली. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे शहरवासीयांना भाजपच्या नेतृत्वावर आणि आमदार महाले यांच्या कार्यक्षमतेवर अधिक विश्वास बसला आहे. आमदार श्वेताताई महाले यांनी स्वतःच्या कार्यशैलीने आणि कामांनी एक मजबूत नेतृत्वाची प्रतिमा उभी केली आहे. शहराच्या विकासासाठी त्यांच्या असलेल्या तळमळीमुळे आणि शासनाकडून निधी मिळवण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे, त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे उमेदवार पंडितराव देशमुख यांच्यासह भाजपाच्या सर्व नगरसेवकांना मोठ्या मताने पालिकेत पाठवण्याचा पक्का इरादा मतदारांनी केला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ही निवडणूक केवळ व्यक्तींची नसून, विकासकामांवरील शिक्कामोर्तब ठरणार आहे, असे चित्र सध्या चिखली शहरात दिसत आहे.त्यामुळे विरोधकांनी सुरु केलेले खोटेनाटे दावे खारीज होणार असुन मतदारांना भयभीत करुन मत मिळवण्यासाठी चालवलेला प्रयत्न देखील मतदार हाणुन पाडणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!