चिखली तालुक्यातील मलगी गावातील शेतकऱ्यांवर संकटांचा डोंगर: पावसाचा खंड, अतिवृष्टी आणि येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव

Soybean Yellow Mosaic Virus Malgi

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): यंदाचा खरीप हंगाम चिखली तालुक्यातील मलगी गावातील शेतकऱ्यांसाठी संकटांचा डोंगर घेऊन आला आहे. पेरणीच्या वेळी पावसाने दगा दिल्याने पिके सुकू लागली. त्यानंतर आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून पिकांची मुळे कुजण्याची समस्या उद्भवली. आता या सगळ्यावर कळस म्हणून सोयाबीन पिकावर येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या तिहेरी संकटांमुळे मलगी शिवारातील शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांनी प्रशासनाकडे तातडीने नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

मलगी गावात यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस आणि मक्का या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिली, त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणी केली. मात्र, पिके कोवळ्या अवस्थेत असताना पावसाने खंड पाडला. यामुळे पिके सुकायला लागली. काही शेतकऱ्यांनी खर्च करून पाण्याची सोय केली आणि पिके जगवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर आलेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणी साचले आणि सोयाबीनसह इतर पिकांची मुळे कुजण्यास सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

आता या संकटांवर कळस म्हणून सोयाबीनवर येलो मोजॅक रोगाने हल्ला केला आहे. या रोगामुळे सोयाबीनच्या पानांवर प्रथम पिवळे किंवा फिकट पिवळे डाग दिसू लागतात. हळूहळू हे डाग वाढतात आणि संपूर्ण पान पिवळे पडते. या रोगामुळे झाडाची वाढ थांबते, शेंगांची संख्या कमी होते आणि शेंगा पिवळ्या पडतात. परिणामी, दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा दाणे पोकळ होतात. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यापूर्वी मलगी शिवारात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला होता, आणि आता येलो मोजॅक रोगाने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

मलगी गावातील शेतकरी प्रभाकर भुसारी (गट क्रमांक 88), कृष्णा भुसारी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने नुकसानीची पाहणी करून मदत देण्याची विनंती केली आहे. “आम्ही आधीच पावसाच्या खंडामुळे आणि अतिवृष्टीमुळे त्रस्त झालो आहोत. त्यात आता येलो मोजॅक रोगाने आमच्या पिकांचा सत्यानाश केला आहे. सरकारने लवकरात लवकर पंचनामा करून आम्हाला आर्थिक मदत द्यावी,” अशी मागणी प्रभाकर भुसारी यांनी केली.

मलगी शिवारातील शेतकरी सध्या आर्थिक अडचणी आणि नैराश्याशी झुंजत आहेत. प्रशासनाने तात्काळ पावले उचलून नुकसानीचा पंचनामा करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!