शेतात काम करताना अस्वलाचा हल्ला; दोन शेतकरी गंभीर जखमी ! दोन महिन्यांत सात हल्ल्यांनी परिसरात भीतीचे वातावरण!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील करवंड आणि पळसखेड परिसरात अस्वलांच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी पुन्हा एकाच अस्वलाने अवघ्या दहा मिनिटांच्या फरकाने दोन शेतकऱ्यांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करवंड येथील दत्ता लहाने आणि रोहिदास राठोड हे दोघेही आपापल्या शेतात काम करत होते. दत्ता लहाने शेतात सोयाबीन सोंगणी करत असताना दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. काही अंतरावर असलेल्या रोहिदास राठोड यांच्यावरही त्याच अस्वलाने झडप घातली. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गेल्या दोन महिन्यांत या भागात तब्बल सात वेळा अस्वलांचे हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. तरीही वनविभागाकडून कोणताही ठोस उपाययोजना न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
“शेतात काम करायचं की जीव वाचवायचा?” असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.

दरम्यान, जखमी शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही सरकारी आर्थिक मदत मिळालेली नाही, त्यामुळे त्यांना उपचारांचा संपूर्ण खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागत असल्याचं सांगितलं जात आहे.

स्थानिक नागरिकांनी वनविभागाला आवाहन केलं आहे की, तात्काळ पिंजरा लावून अस्वलाला पकडावं आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!