मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) नायगाव (द.) येथील शेंदला स्टेट बँकेत दोन अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घुसखोरीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार २२ नोव्हेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास घडला.
२४ नोव्हेंबरला सकाळी कर्मचारी रवी शेळके बँकेत आले असता सुरक्षा अलार्म बंद पडलेला आणि एका खिडकीचा गज तुटलेला दिसला. त्यांनी लगेच शाखा व्यवस्थापक सोनल खैरे यांना माहिती दिली.
तपासात स्ट्रॉग रूममधील रोकड, दागिने आणि सर्व कागदपत्रे सुरक्षित असल्याचे दिसून आले. चोरट्यांनी अलार्मची वायर कापून सुरक्षा यंत्रणा निकामी केली होती.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरटे खिडकी तोडून बँकेत घुसताना आणि चोरीचा प्रयत्न करताना स्पष्ट दिसत आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.













