खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेगाव बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील रोकड रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४८ हजार ८६४ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी घडली.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील वर्षा संजय पिंगळे (वय ४३) व त्यांचे पती संजय पिंगळे हे दोघे तेल्हारा येथे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना हा प्रकार घडला. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वर्षा पिंगळे यांच्या पर्समधून दहा हजार रुपये रोख, सोन्याचे पेंडल व सोन्याचे मणी असा ऐवज चलाखीने चोरून नेला.
या प्रकरणी वर्षा पिंगळे यांनी शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार श्याम आघाव करीत आहेत.
विशेष म्हणजे, शेगाव बसस्थानकावर यापूर्वीही अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी बसमध्ये चढताना आपल्या पर्स, बॅग आणि दागिने सुरक्षित ठेवावेत, असे आवाहन शेगाव शहर पोलिसांनी केले आहे. गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शेगाव बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील ४८ हजारांचा ऐवज लंपास…
Published On: November 7, 2025 4:47 pm












