चिखली, (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील मुख्यालयी मौनी महाराज मठात आज ‘शासन आपल्या दारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वीपणे पार पडला. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तहसील कार्यालय आणि पंचायत समिती, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात नागरिकांच्या विविध समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले.
तुम्हाला मुलगी असेल तर आता मिळणार 3 लाख रुपये; वाचा सविस्तर माहिती!
या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ थेट त्यांच्या दारी मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. यामध्ये ७/१२ उतारे, फेरफार नोंदी, शेतजमिनीच्या नोंदी, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यांचे मंजुरी आदेश, रेशन कार्ड नोंदी, निवडणूक विषयक नोंदी, तसेच आरोग्य तपासणी यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय, कृषी विभागामार्फत फवारणी पंप आणि सुधारित सोयाबीन बियाणांचे वाटप करण्यात आले. ‘जिवंत सातबारा’ मोहिमेंतर्गत लाभार्थ्यांना बेबी केअर किट आणि सातबारा दस्तऐवजांचे वाटपही करण्यात आले. पी. एम. किसान योजनेशी संबंधित समस्यांचे निराकरण आणि अँग्री स्टॅक अंतर्गत फार्मर आय. डी. ची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्यात आली.
अनुकंपावरील दहा हजार पदे भरणार; उमेदवार नियुक्तीचे अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांचे
शिबिरात आरोग्य विभागामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. आमदार श्वेता महाले यांनी स्वतः या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी मिळालेल्या घरकुलांना गती देण्यासाठी विशेष सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. अनेक प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली निघाल्याने नागरिकांनी महसूल विभागाच्या या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी महसूल विभागाने असे उपक्रम यापुढेही नियमितपणे आयोजित करण्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल.
कार्यक्रमाला चिखलीचे नवनिर्वाचित गटविकास अधिकारी समाधान वाघ, डॉ. प्रतापसिंग राजपूत, पंडितदादा देशमुख, सागर पुरोहित, सुरेंद्र पांडे, कृष्णकुमार सपकाळ, संजय गाडेकर, दत्ता सुसर, विजय नकवाल, विजय खरे, श्याम वाकोदकर, संतोष काळे, दीपक खरात, पंजाबराव धनवे, विजय वाळेकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, आरोग्य अधिकारी, नायब तहसीलदार, महिला व बालविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तसेच वन, कृषी, विधी आणि आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी महसूल विभाग आणि पंचायत समितीतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या समर्पित कार्यामुळे नागरिकांना थेट आणि जलद सेवा मिळाली, ज्यामुळे ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य झाले.