वळती (राज धनवे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): नेपाळच्या पोखरा येथे आयोजित ८व्या ओपन इंटरनॅशनल टूर्नामेंटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वळतीच्या संतोष पंडित खरात याने अथेलेटिक्स मधील ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक (Silver Medal) मिळवून देशाचा मान वाढवला आहे. भारतीय पॅसिफिक स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघ पाठवला होता. संतोषने आपल्या चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ही कामगिरी केली.

संतोषच्या या यशामागे त्याचे प्रशिक्षक गणेश पेरे सर आणि कार्तिक पोटे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. त्यांनी संतोषला कठोर प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देऊन या स्पर्धेसाठी तयार केले. संतोषने आपल्या खेळातून दाखवून दिले की, मेहनत आणि समर्पणाने कोणतेही ध्येय गाठता येते. या स्पर्धेत त्याने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत दुसरे स्थान मिळवत रौप्यपदकावर (Silver Medal) आपले नाव कोरले.
वळती येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा!
या यशाबद्दल संतोष म्हणाला, “हे पदक माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या प्रशिक्षकांनी आणि कुटुंबीयांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे.” त्याच्या या यशाने वळती गावासह संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे.
भारतीय पॅसिफिक स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियानेही संतोषच्या या यशाचे कौतुक केले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. संतोषच्या या यशाने इतर तरुण खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
संतोषच्या या यशाबद्दल वळती येथील गावकरी, कुटुंबीय आणि खेळप्रेमींकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बुलढाणा कव्हरेज न्यूज परिवाराकडून संतोषचे या यशासाठी खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!