
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहरातील विविध भागांत त्यांच्या समर्थकांनी लावलेले शुभेच्छांचे फलक आणि बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पण या बॅनर आणि पोस्टरवर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली- ती म्हणजे काँग्रेस पक्षाचे चिन्ह, पक्षाचे नाव किंवा पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्याचा फोटो किंवा उल्लेख कुठेही नव्हता!
ही बाब चिखलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. काँग्रेसने राहुल बोंद्रे यांना तीन वेळा आमदारकीची संधी दिली, दोनदा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली, म्हणजेच पक्षाने त्यांना नेहमीच मान-सन्मान दिला. तरीही वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकांवर पक्षाचा उल्लेख टाळण्यामागे नेमके काय दडले आहे? हा प्रश्न आता अनेकांच्या मनात घर करतोय.
पक्षाशी नाराजी की नव्या राजकीय वाटेची तयारी?
राहुल बोंद्रे यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर काँग्रेस पक्षाचा कोणताही उल्लेख नसणे, ही बाब पक्षाशी असलेल्या नाराजीचे संकेत देणारी मानली जात आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचाही या फलकांवर कुठेही उल्लेख नव्हता. यामुळे राजकीय विश्लेषक आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
एमएस धोनी युद्धात सामील होणार? रक्षा मंत्रालयाची टेरिटोरियल आर्मीला तयारीची सूचना!
यापूर्वी, मागील विधानसभा निवडणुकीदरम्यानही राहुल बोंद्रे यांच्या भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. तेव्हा असे बोलले जात होते की, बोंद्रे भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत, पण काही भाजपा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने हा प्रवेश ऐनवेळी थांबला. या निवडणुकीनंतर बोंद्रे यांच्या काही निष्ठावान समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपाकडे आपला कल दाखवला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय- राहुल बोंद्रे यांचा मोर्चा आता महायुतीच्या दिशेने वळतोय का?
राजकारणात बदल हा स्थायीभाव!
राजकारणात मैत्री आणि वैर कधीही स्थिर नसतात. आज जो जवळचा आहे, तो उद्या प्रतिस्पर्धी होऊ शकतो, आणि जो प्रतिस्पर्धी आहे, तो उद्या मित्र बनू शकतो. राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवर काँग्रेसचा उल्लेख गायब असणे, ही घटना या राजकीय वास्तवाचीच जाणीव करून देते. गेल्या काही काळात बुलडाणा जिल्ह्यातील राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत बोंद्रे यांच्या या कृतीमुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
बोंद्रेंनी मौन बाळगले, चर्चांना उधाण
या संपूर्ण प्रकरणावर राहुल बोंद्रे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण वाढदिवसाचे बॅनर ज्या पद्धतीने काँग्रेसविरहित होते, त्यामुळे त्यांच्या राजकीय भविष्याबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काहींच्या मते, ही केवळ नाराजी व्यक्त करण्याची पद्धत आहे, तर काहींच्या मते, बोंद्रे आता नव्या राजकीय प्रवासाची तयारी करत आहेत.
राहुल बोंद्रे काँग्रेसमध्येच सक्रिय राहणार की नव्या राजकीय पक्षात प्रवेश करणार, हे येणारा काळच ठरवेल. पण सध्याच्या घडामोडींमुळे चिखली आणि बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणात एक नवी उत्सुकता निर्माण झाली आहे. राजकारणात कोण कधी काय निर्णय घेईल, याचा नेम नाही. त्यामुळे बोंद्रे यांच्या पुढील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.