अमरावती (बुलडाणा कव्हरेज न्युज):प्रेमजाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार अमरावतीत उघडकीस आला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपच्या नावाखाली आरोपीने पीडितेला फसवून तिचे शोषण केले असून, या अत्याचारातून संबंधित मुलगी सध्या तब्बल आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हा धक्कादायक प्रकार खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. या प्रकरणात शेख सलमान शेख सलीम (वय २१, रा. यासीन नगर, अमरावती) या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गवंडीकाम करत असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी २०२४ साली कामाच्या निमित्ताने आरोपीच्या संपर्कात आली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. याच संधीचा फायदा घेत आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघांनी भाड्याच्या खोलीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरुवात केली.
दरम्यान, या संबंधातून पीडिता गर्भवती राहिली. प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी अमरावती येथील डफरीन रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर येताच संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
तपासात असेही निष्पन्न झाले की, पीडितेचे सध्याचे वय १८ वर्षे ३ महिने असून, ती अल्पवयीन असतानाच आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. पीडितेच्या जबाबावरून खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२)(एम) तसेच पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे अमरावती शहरात खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.











