चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील पळसखेड जयंती गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील २३ वर्षीय तरुण तुषार सुरेश लोखंडे याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे, आणि गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.
दिनांक १८ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. चिखली शिवारातील नाजीम खा हसमखा यांच्या शेतातील एका पळसाच्या झाडाला तुषारने गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती तुषारचे काका प्रकाश ज्ञानदेव लोखंडे यांनी चिखली पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाची पंचनामा प्रक्रिया पूर्ण केली.
मेरा बुद्रुक येथील युवा पोलीस कर्मचाऱ्याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू!
चिखली पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद घेण्यात आली आहे. पोहेकॉ छाया घुबे यांनी तक्रार दाखल करून घेतली असून, तपास अधिकारी पोहेकॉ राजू सुसर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, आज दुपारी ३ वाजता तुषारचा अंत्यविधी पळसखेड जयंती येथे शोकाकुल वातावरणात संपन्न झाला. गावातील अनेकांनी अंत्ययात्रेत सहभाग घेऊन तुषारला अखेरचा निरोप दिला. या घटनेने गावकऱ्यांवर दुखाचा डोंगर कोसळला असून, तरुणाच्या अकाली निधनाने सर्वजण सुन्न झाले आहेत.