साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या पहाट फाउंडेशनतर्फे २८ जून २०२५ रोजी बुलढाणा येथील सामाजिक न्याय भवन सभागृहात राज्यस्तरीय पर्यावरण संवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले. चार सत्रांमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या समारोपात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील पत्रकार सचिन मधुकर खंडारे यांना पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्यासाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आले.
सचिन खंडारे यांना या पुरस्कारासह सन्मानपत्र, आकर्षक ट्रॉफी आणि काजूचा वृक्ष भेट म्हणून देण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी आणि समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्याची भूमिका सातत्याने मांडली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पहाट फाउंडेशनने त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित केले.
पुरस्कार वितरण सोहळ्याला मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, मिसेस इंडिया सौ. श्वेता परदेशी, महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गेडाम, सचिन देवरे, पहाट फाउंडेशनचे संचालक अमोल बीलंगे आणि संचालिका अर्पिता सुरडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते खंडारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सचिन खंडारे यांना पत्रकारिता क्षेत्रातील हा चौथा पुरस्कार आहे. यापूर्वी त्यांना सामाजिक आणि इतर क्षेत्रांतील कार्यासाठी एकूण दहा पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारामुळे बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.















