चिखली (उद्धव पाटील- बुलडाणा कव्हरेज न्युज): पंढरपूरच्या ३४० व्या पालखी प्रस्थानाच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल भक्तांसाठी एक नवं कोरं भक्तिगीत रसिकांच्या भेटीला आलं आहे. “ओढ तुझ्या पंढरीची” (Odh Tujhya Pandharichi) असं या गाण्याचं नाव असून, चिखलीचे सुपुत्र पवन लोणकर यांच्या माऊली म्युझिक कंपनीने हे गीत सादर केलं आहे. सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या मधुर आणि भावपूर्ण आवाजाने हे गीत ऐकणाऱ्यांच्या मनाला भक्तिरसात न्हाऊ घालत आहे.
माऊली म्युझिक कंपनीचं हे पहिलंच भक्तिगीत असून, प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासांतच त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यूट्यूबसह सर्व प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर हे गीत उपलब्ध असून, विठ्ठल भक्तांनी त्याला भरभरून दाद दिली आहे. अनेकांनी या गाण्यावर आधारित रील्स आणि भक्तीमय व्हिडिओ बनवून आपली श्रद्धा व्यक्त केली आहे.
या गीताचं संगीत नितीन उगलमुगले यांनी सजवलं असून, गीताचे शब्द मुकुंद भालेराव यांनी लिहिले आहेत. गाण्याच्या शीर्षक ओळीची रचना अपूर्व राजपूत यांनी केली आहे. संगीत संयोजनाची जबाबदारी पद्मनाभ गायकवाड यांनी सांभाळली, तर ध्वनिमुद्रण आणि मिश्रण विनायक पवार यांनी केलं आहे. गाण्याचं संकलन धीरज भापकर यांनी केलं असून, दिग्दर्शनाची कमान स्वतः पवन लोणकर यांनी हाती घेतली आहे.

संगीतकार नितीन उगलमुगले यांनी या गीतामागचा प्रवास सांगताना म्हटलं, “आम्ही यापूर्वी ‘मायबापा विठ्ठला’ हे भक्तिगीत सादर केलं होतं. त्या गाण्याला रसिकांनी भरभरून प्रेम दिलं. त्याच प्रेरणेतून मी, मुकुंद भालेराव आणि पवन लोणकर यांनी मिळून ‘माऊली म्युझिक कंपनी’ स्थापन केली. आम्ही तिघंही वारकरी परंपरेच्या संस्कारात वाढलो आहोत. त्यामुळे भक्तिगीतांमधून विठ्ठल भक्तीचा सुगंध पसरवण्याचा आमचा संकल्प आहे.”
वळती येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा!
“ओढ तुझ्या पंढरीची” हे गीत पंढरपूरच्या वारीची ओढ, वारकऱ्यांची अटळ श्रद्धा, चालत्या पावलांमधील भक्ती आणि विठ्ठलाच्या भेटीची आस यांचं हृदयस्पर्शी चित्रण करतं. गाण्याचे शब्द, संगीत आणि अजय गोगावले यांचा भावपूर्ण आवाज यामुळे हे गीत ऐकणाऱ्यांच्या मनाला थेट भक्तीच्या विश्वात घेऊन जातं.
“आम्ही भक्ती आणि सांस्कृतिक संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचवू इच्छितो. पारंपरिक भक्तिगीतांना आधुनिक सादरीकरणाची जोड देऊन नव्या स्वरूपात रसिकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासोबतच नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचंही आमचं ध्येय आहे,” असं पवन लोणकर यांनी सांगितलं.
हे गीत यूट्यूबसह सर्व प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर ऐकायला व पाहायला उपलब्ध असून, विठ्ठल भक्तांसाठी “ओढ तुझ्या पंढरीची” हे गीत एक भक्तिरसाने भरलेला, आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव ठरत आहे.