नवऱ्याच्या माघारी दिरासोबत केले खोटे लग्न; मी तुला मारून टाकू का? असे म्हणताच दिराने….नायगाव येथील घटना

नवऱ्याच्या माघारी दिरासोबत केले खोटे लग्न; मी तुला मारून टाकू का? असे म्हणताच दिराने....

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): काही दिवसांपूर्वी नायगाव खुर्द शिवारातील पेनटाकळी धरणाच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास अमडापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने केला असता, हा खून असल्याचे उघड झाले. मृतक महिलेचा दीर मधुकर शामराव गायकवाड याने गळा आवळून तिचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मधुकरवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

या घटनेची सुरुवात २९ जून २०२५ रोजी झाली, जेव्हा नायगाव खुर्द येथील आशा किशोर गायकवाड (वय २७) ही शेतातून घरी जाण्यास निघाली होती. मात्र, ती घरी पोहोचली नाही. याबाबत तिचा पती किशोर शामराव गायकवाड याने अमडापूर पोलीस स्टेशनला मिसिंग तक्रार (क्रमांक ००१९/२०२५) दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, पेनटाकळी धरणाच्या पाण्यात आशाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तातडीने मृतदेहावर पंचनामा करून चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करवून घेतले.

तपासादरम्यान, आशाचा भाऊ नितीन भीमराव अवसरमोल (राहणार नांद्रा धांडे) याने दिलेल्या तक्रारीनुसार, आशाला तिचा पती किशोर शामराव गायकवाड, सासरा शामराव मारुती गायकवाड, सासू सखुबाई शामराव गायकवाड आणि दीर मधुकर शामराव गायकवाड यांनी माहेरहून तीस हजार रुपये आणण्यासाठी त्रास दिल्याचा आरोप केला. या त्रासाला कंटाळून आशाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०८, ८५ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला.

मात्र, पोलिसांनी सखोल तपास केला असता, या प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले. मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर आणि स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निखिल निर्मळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल भगवान शेवाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल चंद्रशेखर मुरुडकर यांनी तपासाला गती दिली. तपासादरम्यान, आरोपी मधुकर शामराव गायकवाड याने गुन्ह्याची कबुली दिली.

मधुकरने पोलिसांना सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून त्याचे आशासोबत प्रेमसंबंध होते. आशा त्याला वारंवार लग्नाची मागणी करत होती. यासाठी मधुकरने तिला खूश करण्यासाठी मुळा-मुळी येथील मंदिरात बनावट लग्नाचा ड्रामा केला होता. त्याने आशाचे जुने मंगळसूत्र तोडून स्वतःच्या नावाने नवे मंगळसूत्र बनवून तिच्या गळ्यात घातले होते. मात्र, आशाच्या सततच्या पैशाच्या मागणीमुळे तो त्रस्त झाला होता. यामुळे त्याने दोन महिन्यांपूर्वीच तिचा खून करण्याचा कट रचला.

घटनेच्या दिवशी, २९ जून २०२५ रोजी सकाळी आशा, तिचा पती किशोर आणि मधुकर हे शेतात सोयाबीनच्या पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास आशाने पतीला हाताने इशारा करून घरी जाण्याचे सांगितले. तिच्या मागोमाग मधुकरही निघाला. त्याने आशाला रस्त्यात गाठून दोघे गट नंबर ३१ मधील शेताकडे गेले. तिथे पेनटाकळी धरणाच्या पाण्याजवळ एका दगडावर बसलेल्या मधुकरने आशाला प्रेमाने जवळ घेतले. त्याने तिच्या दोन्ही हातांचे मनगट पकडले आणि पायांनी तिचे पाय घट्ट दाबले. त्यानंतर, सोबत आणलेल्या दोरीने तिचा गळा आवळला. गमतीने “मी तुला मारून टाकू का?” असे विचारल्यावर आशाने गंमतीनेच होकार दिला. मात्र, मधुकरने तिचा गळा आवळून खून केला.

खून केल्यानंतर मधुकरने आशाचा मृतदेह धरणाच्या पाण्यात टाकला आणि तो कोणाला दिसू नये म्हणून त्यावर गाळ आणि दगड टाकले. तिची टिफिन डब्याची थैली, चप्पल आणि गळा आवळण्यासाठी वापरलेली दोरीही त्याने पाण्यात टाकून त्यावर दगड ठेवले. या सर्व कृत्याची कबुली मधुकरने पोलिसांना दिली.

या खुलाशानंतर पोलिसांनी गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३(१) आणि २३८(ए) ची वाढ करून तपास पुढे चालवला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक सखोल तपास करत आहे. या घटनेने नायगाव खुर्द परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिकांमध्ये या प्रकरणाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “नवऱ्याच्या माघारी दिरासोबत केले खोटे लग्न; मी तुला मारून टाकू का? असे म्हणताच दिराने….नायगाव येथील घटना”

Leave a Comment

WhatsApp Join Group!