चिखली (राज धनवे- बुलढाणा कव्हरेज न्यूज): जर समाजसेवकच लोकांच्या समस्या सोडवत असतील, तर मग नगरसेवक कशाला हवेत? असा सवाल चिखली शहरातील, विशेषतः वीर सावरकर नगर भागातील लोक विचारत आहेत. नगरसेवकांनी लोकांच्या अडचणींकडे लक्ष द्यायला हवं, पण तसं होत नाही. त्यामुळे समाजसेवकांनी पुढे येऊन पालिकेच्या अधिकाऱ्यांना जागं केलं आहे. यामुळे नगरसेवक काय काम करतात, हा प्रश्न लोकांना पडला आहे.
चिखलीच्या वीर सावरकर नगर भागात गटारी दुरुस्तीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना त्रास देतोय. याबाबत समाजसेवक संतोष गवारे पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यांनी 1 जुलै 2025 रोजी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं. या निवेदनात त्यांनी महाराणा प्रताप शाळेजवळ आणि गजानन जाधव यांच्या घरासमोरच्या गटारींची दुरवस्था दाखवली. तसंच, या भागातील स्वच्छता आणि इतर समस्यांबाबतही त्यांनी पालिकेला सतत आठवण करून दिली.
चिखलीतील वीर सावरकर नगरातील नालीच्या दुरवस्थेमुळे स्थानिक रहिवासी त्रस्थ; प्रशासनाचे दुर्लक्ष
या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर पालिकेने वीर सावरकर नगरात स्वच्छतेची कामं सुरू केली. यामुळे तिथल्या लोकांना थोडा दिलासा मिळाला. पण याचवेळी लोकांनी प्रश्न विचारला की, समाजसेवक जर अशी कामं करत असतील, तर नगरसेवकांचं काय काम? स्थानिक तरुण म्हणतात, समाजसेवक चांगलं काम करत असतील, तर त्यांनाच ‘जनसेवक’ किंवा ‘नगरसेवक’ म्हणून काम करायला द्यावं. नगरसेवकांचं काय काम, असा प्रश्न त्यांना पडलाय.
नगरपालिकेचा कारभार प्रशासकीय अधिकारी सांभाळतात. पण त्यांना योग्य दिशा देण्यासाठी लोक नगरसेवक निवडतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणुका मार्गी लागल्या असून, त्याची तयारी जोरात सुरू आहे. पण याचवेळी चिखलीतून एक वेगळी मागणी येतेय. जर नगरसेवक आपलं काम करत नसतील आणि समाजसेवकच लोकांच्या अडचणी सोडवत असतील, तर नगरसेवकांसाठी एवढा पैसा खर्चायचा कशाला, असा सवाल तरुणांनी विचारलाय.
वीर सावरकर नगरमधील लोक म्हणतात, संतोष गवारे पाटील यांच्यासारखे समाजसेवक पालिकेशी सतत संपर्क करून, निवेदनं देऊन आणि पाठपुरावा करून समस्या सोडवतात. मग नगरसेवकांचं नेमकं काम काय, असा प्रश्न लोकांना पडलाय. सरकारने याचा विचार करावा, अशी मागणी चिखलीतील लोक करत आहेत.
1 thought on “नगरसेवक हवेच कशाला? चिखलीतील समाजसेवक करताहेत जनतेच्या समस्या सोडवण्याचे काम”