भरोसा (अंकुश पाटील-बुलढाणा कव्हरेज न्यूज): यंदाचा खरीप हंगाम चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अडचणींचा ठरला आहे. पेरणीच्या वेळी पावसाने दडी मारल्याने पिके सुकायला लागली. त्यानंतर आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून पिकांची मुळे कुजण्याची समस्या निर्माण झाली. आता यात भर पडली आहे ती सोयाबीन पिकावरील येलो मोजॅक रोगाच्या प्रादुर्भावाची. विशेषतः चिखली तालुक्यातील भरोसा शिवारातील शेतकरी या संकटामुळे हवालदिल झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नुकसानीचा पंचनामा करून मदत देण्याची मागणी केली आहे.
गोठ्यात गेला दूध काढून ठेवले, अन् गळफास घेत संपवलं जीवन; पिंपळगाव सैलानीतील धक्कादायक घटना
भरोसा शिवारात यंदा सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. हंगामाच्या सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणी केली. पण पिके कोवळ्या अवस्थेत असताना पावसाने खंड पाडला. यामुळे पिके सुकायला लागली. काही शेतकऱ्यांनी पाण्याची सोय करून पिके जगवण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर आलेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणी साचले. यामुळे सोयाबीनसह इतर पिकांची मुळे कुजण्यास सुरुवात झाली. आता या सगळ्या संकटांवर कळस ठरला आहे तो येलो मोजॅक रोगाचा.
येलो मोजॅक रोगामुळे सोयाबीनच्या पानांवर सुरुवातीला पिवळे किंवा फिकट पिवळे डाग दिसतात. हळूहळू हे डाग मोठे होतात आणि संपूर्ण पान पिवळे पडते. काही ठिकाणी पानांवर हिरवट डागही दिसतात. या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते, शेंगांची संख्या कमी होते आणि शेंगा पिवळ्या पडतात. परिणामी, दाण्यांचा आकार लहान होतो किंवा दाणे पोकळ राहतात. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात मोठे नुकसान होत आहे. यापूर्वी भरोसा शिवारात हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. आता येलो मोजॅकमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
भरोसा शिवारातील शेतकरी विष्णू थुटटे, भागवत वाघमारे, ज्ञानेश्वर थुटटे, विलास राऊत, दीपक गाडेकर आणि ज्ञानेश्वर उबाळे यांच्यासह अनेकांनी प्रशासनाकडे तातडीने नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी केली आहे. “आम्ही आधीच पावसाच्या खंडामुळे आणि अतिवृष्टीमुळे हैराण झालो आहोत. आता येलो मोजॅकमुळे पिकाचं नुकसान होत आहे. सरकारने लवकर पाहणी करून आम्हाला मदत करावी,” अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना येलो मोजॅक रोग नियंत्रणासाठी योग्य ती मार्गदर्शन आणि उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, हा रोग पसरू नये यासाठी तातडीने उपाय करणे गरजेचे आहे, अन्यथा यंदाचे उत्पादन जवळपास हातातून जाण्याची भीती आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.