मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्युज): महाराष्ट्रात (monsoon in maharashtra) यंदा मान्सून १५ जूननंतरच जोर धरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता योग्य वेळेची वाट पाहावी, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे. काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी आणि मच्छीमारांनी सावधगिरी बाळगावी, असेही सांगण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसाची स्थिती, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता, धरणातील पाणीसाठा आणि खते-बियाण्यांचा पुरवठा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी बैठकीत सादरीकरणाद्वारे शेतीच्या तयारीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “राज्यात १५ जूननंतरच मान्सून सर्व भागांत सक्रिय होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरणीला घाई न करता पावसाचे वातावरण स्थिर होण्याची वाट पाहावी.” त्यांनी सांगितले की, राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी, १२ जिल्ह्यांमध्ये २५ ते ५० टक्के, चार जिल्ह्यांमध्ये ५० ते ७५ टक्के, तर एका जिल्ह्यात १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. खते आणि बियाण्यांचा पुरवठा सुरळीत असून, बहुतांश भागात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
तुफान पावसात लिंबाचं झाड कोसळलं; रुपेश रिंढे यांनी वाचवले कुटुंब !
हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी मान्सूनच्या प्रगतीबाबत सादरीकरण केले. त्या म्हणाल्या, “येत्या तीन-चार दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होईल. कोकण आणि गोव्यात १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १३ आणि १४ जून रोजी काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात १२ ते १५ जून आणि मराठवाड्यातील काही भागात १२ ते १४ जून दरम्यान पाऊस पडेल.” कर्नाटकातही १२ ते १५ जून दरम्यान जोरदार पाऊस अपेक्षित आहे. मान्सूनच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असल्याने मच्छीमारांना १२ ते १५ जून दरम्यान समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वादळी वातावरणात खुल्या मैदानात काम टाळावे, झाडांखाली आश्रय घेऊ नये, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वीजपुरवठा बंद ठेवावा, तसेच नदी, तलाव, ओढे यांसारख्या पाण्याच्या स्रोतांपासून दूर राहावे, अशा सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत.
राज्य सरकारने धरणातील पाणीसाठा आणि पीक पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. योग्य वेळी पेरणी केल्यास पिकांचे नुकसान टाळता येईल, असे कृषी विभागाने म्हटले आहे. शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.