ताजपुरी (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): एका क्षुल्लक कारणावरून मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा निर्घृण खून केल्याची हृदयद्रावक घटना ताजपुरी (ता. शिरपूर) येथे घडली. माशाची भाजी कुत्र्याने खाल्ल्याने संतप्त झालेल्या २५ वर्षीय तरुणाने रागाच्या भरात आपल्या ६७ वर्षीय आईला लाकडी दांडक्याने मारहाण करून ठार केले. थाळनेर पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपीला अटक केली असून, या घटनेमुळे ताजपुरी परिसरात खळबळ उडाली आहे.
ग्राहकाकडून 500 रुपये घेते, आम्हाला फक्त 200 रुपये देते; 70 वर्षीय कडूबाई ने चार खोल्या मध्ये…
टापीबाई रेबला पावरा (वय ६७, रा. खैरखुटी, ह.मु. ताजपुरी) यांनी त्या रात्री आपल्या मुलासाठी जेवणात माशाची भाजी तयार केली होती. मात्र, ही भाजी कुत्र्याने खाल्ल्याने त्यांचा मुलगा आवलेस रेबला पावरा (वय २५) चिडला. यावरून आई-मुलात जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि राग अनावर झालेल्या आवलेसने जवळ पडलेल्या लाकडी दांडक्याने आपल्या आईवर हल्ला चढवला. या हल्ल्यात टापीबाई यांच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेला टापीबाई यांचा नातू निखील रेबला पावरा याने पोलिसांना संपूर्ण हकिगत सांगितली. त्याच्या माहितीच्या आधारे थाळनेर पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी टापीबाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. दरम्यान, आरोपी आवलेस अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला होता.
थाळनेर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ चार पथके तयार केली. शिरपूर फाटा, टोलनाका, आढे आणि वाठोडा परिसरात रात्रीच शोधमोहीम हाती घेण्यात आली. अखेर आढे शिवारातील एका केळीच्या शेतात लपलेल्या आवलेसला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. चौकशीदरम्यान आवलेसने आपल्या आईचा खून केल्याची कबुली दिली. मृत टापीबाई यांचे जावई लेदा तेरसिंग पावरा यांनी दिलेल्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1 thought on “माशाची भाजी कुत्र्याने खाल्ल्याने मुलाने केला आईचा खून; थाळनेर पोलिसांनी चार तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या”