अंढेरा (कैलास आंधळे- बुलढाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा तालुक्यातील अंधेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पिंपरी आंधळे गावातील योगेश बबन आंधळे यांनी आज सकाळी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून सहा मोबाइल फोन आणि एक स्कूटी जप्त करण्यात आली आहे.
योगेश आंधळे यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अपराध क्रमांक २३६/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३ (२) नुसार गुन्हा नोंदवला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल टॉवर लोकेशन आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी काही तासांतच आरोपी गजानन वाघ (वय २४, राहणार गवळीपुरा, चिखली) आणि एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. या आरोपींकडून एमएच २८ बीझेड ०१७१ क्रमांकाची स्कूटी आणि त्याच्या डिक्कीत लपवलेले सहा मोबाइल फोन मिळून आले.
पोलिसांनी आरोपींकडे विचारपूस केली असता, त्यांनी कबूल केले की, अंधेरा फाट्यावरील पेट्रोल पंपावरून दोन मोबाइल, देऊळगाव राजा येथून तीन मोबाइल आणि चिखली येथून एक मोबाइल चोरी केले होते. ही सर्व चोऱ्या आज सकाळी घडल्या असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ही सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, एसडीपीओ मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंढेरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जारवाल, पो.का सिद्धार्थ सोनकांबळे, नितीन फुसे, किशोर जाधव, माधुरी इंगळे यांनी केली.. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला आहे, आणि चोरीसारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची सतर्कता दिसून येत आहे.












