अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) — मेरा बुद्रुक–मडपगाव रोडवर ट्रॅक्टरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणात अंढेरा पोलिसांनी १० डिसेंबर रोजी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रमेश किसन टेटवार व देविदास श्यामराव बलकार हे दोघे दुचाकीने (MH 28 BR 2662) शेताकडे जात असताना दत्त मंदिर पाटीजवळ विना नंबर प्लेटच्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर चालकाने ट्रॅक्टरसह पळ काढला.
या अपघातात रमेश टेटवार यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. देविदास बलकार यांनाही कमरेला गंभीर मार बसला. दोघांना तातडीने चिखलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच रमेश टेटवार यांचा मुलगा नीलेश टेटवार यांनी एमएलसी अहवालासह तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक शंकर संतोष तोडे (रा. मनुबाई) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार भरत पोफळे करीत आहेत.













