मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज):
मेहकर–लोणार मतदारसंघातील पाणीपुरवठा, तीर्थक्षेत्र विकास, गृहनिर्माण, आरोग्य व वारसा संवर्धन प्रकल्प निधीअभावी रखडल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला.
“जलजीवन योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे” अशी थेट टीका त्यांनी केली.
जलजीवन योजनेतील धक्कादायक वास्तव
आमदार खरात यांनी सभागृहात सादर केलेल्या माहितीनुसार,
एकूण १५० पैकी फक्त ११ कामे पूर्ण झाली आहेत.
मेहकर: ५२ पैकी फक्त ६ कामे पूर्ण, ४६ प्रलंबित
लोणार: ६४ पैकी फक्त ५ कामे पूर्ण, ५१ कामे रखडलेली
निधीअभावी कंत्राटदारांनी हात टेकले, अभियंते बदलले; मात्र परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे नागरिकांना आजही स्वच्छ पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
तीर्थक्षेत्र विकास कागदावरच
मेहकर येथील नरसिंह मंदिर, ओलांदेश्वर व शारंगधर बालाजी मंदिर विकासासाठी प्रस्ताव असूनही प्रत्यक्षात निधी मिळालेला नाही.
“मुख्यमंत्र्यांनी तत्त्वतः मान्यता दिली, पण निधी शून्य आहे,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
अमृत-२ योजना स्वहिस्स्याअभावी ठप्प
मेहकर शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर आहे.
१४.६५ कोटी रुपयांचा स्वहिस्सा नगरपरिषदेकडे नसल्याने अमृत-२ अंतर्गत कामे रखडली आहेत. हा भार शासनाने उचलावा, अशी मागणी आमदारांनी केली. यावर उपमुख्यमंत्र्यांनी तत्त्वतः सहमती दर्शविल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य, वारसा व शहर विकासाचे प्रश्न
चार आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी २ कोटींची गरज
पंचपीर बाबा दर्गा परिसर सुशोभीकरणासाठी १० कोटींची मागणी
लोणार सरोवर धोक्यात
जागतिक वारसा स्थळ असलेले लोणार सरोवर धोक्यात असल्याचा गंभीर इशारा आमदारांनी दिला.
शहरातील एसटीपी प्रकल्प वर्षानुवर्षे बंद असून, अप्रक्रियित सांडपाण्यामुळे सरोवराचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
पीएम आवास घरकुले रखडलेली
मेहकर: ५२५ घरकुले
लोणार: सुमारे २०० घरकुले
रस्ते, वीज व पाणी सुविधांसाठी स्वतंत्र निधीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शासनाकडे ठोस मागण्या
आमदार सिद्धार्थ खरात यांनी शासनाकडे पुढील मागण्या केल्या —
जलजीवन योजनेसाठी १०० कोटींची तातडीची मंजुरी
अमृत-२ योजनेचा स्वहिस्सा शासनाने उचलावा
लोणार एसटीपीचे तांत्रिक ऑडिट व पुनर्विकास
मेहकर तीर्थक्षेत्र, पंचपीर दर्गा व शहर विकासासाठी विशेष निधी
पीएम आवास घरकुलांसाठी अतिरिक्त निधी
मेहकर–लोणार मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या रखडपट्टीमुळे नागरिकांचे हाल होत असून, शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी ठाम भूमिका आमदार सिद्धार्थ खरात यांनी मांडली.












